उद्या दहावीचा निकाल... दहावी पास झालो त्याची आदली रात्र आजही आठवते. खरंतर पास होईन की नाही ही चिंता नव्हती (ती ११वीनंतर सुरू झालेली काळजी आहे.) पण मार्क किती पडतात, याची काळजी होती. सायन्सला जाता येतंय की नाही, ही दुसरी काळजी... (म्हणजे सायन्स-मॅथ्सची आवड होती म्हणून सायन्सला... आणि त्यावेळी फॅड होतं सायन्सला जाण्याचं म्हणूनही...) अर्थातच रात्रभर झोप लागणं अशक्यच. तेव्हा काही निवडक पत्रकारांना आदल्या दिवशी निकाल कळायचा... (आत्ताचे पत्रकार गरीब बिच्चारे... तेव्हा माझ्या एका मित्राचे पत्रकार वडील निकाल आदल्या दिवशी आणून २-२ रुपयांना तो 'विकायचे.' म्हणजे तिकीटाच्या खिडकीसारखी एक छोटी खिडकी त्यांच्या चाळीतल्या घरात होती. त्याच्या बाहेर रांगच लागायची पालक-मुलांची... एका छोट्या चिठ्ठीवर नंबर लिहून तो आत सरकवायचा आणि रितसर लेखी रिझल्ट घ्यायचा. म्हणजे पेपर काढण्यापेक्षा हा धंदा केव्हाही चांगला, नाही का?) तसाच मलाही निकाल कळला. (मित्राचे वडीलच पत्रकार असल्यानं मला २ रुपये द्यावे लागले नाहीत, हे कळावे.) पण मी यंदा दहावीला बसलो असतो तर माझं काय झालं असतं माहित नाही... आता कॉम्पिटिशन किमान १०० पटींनी वाढली असेल. बहुदा आजच्या रात्री माझा हार्टफेलच झाला असता... म्हणजे एका-एका मार्कानं प्रवेश हुकत असले, तर काय करायचं. (आणि त्यात पुन्हा ९०:१०, ऑनलाईनचा जांगडगुत्ता... देवा रे देवा!!!!) म्हणजे आता मी बहुदा आर्ट्सला जाण्याच्या तयारीतच झोपलो असतो.
तर सांगायचा मुद्दा हा, की उद्या दहावीचा निकाल आहे. काही जणं पास होतील... काही जणं फेल... ज्यांना पास होण्याची अपेक्षा आहे, ते फेल होणं शक्य आहे. ज्यांना पहिलं येण्याची अपेक्षा आहे, ते दुसरे-तिसरे येणंही शक्य आहे. ज्यांना नापास व्हायची खात्री आहे, त्यांना सुखद धक्काही बसू शकतो... म्हणून उद्याच्या निकालाकडे डोळे लागलेले विद्यार्थी आणि त्यांचे आई-बाबा-ताई-दादा-आजी-आजोबा यांना सांगावसं वाटतंय की दहावीचं वळण हे महत्त्वाचं असलं तरी हे शेवटचं वळण आहे. यापुढे आयुष्यच नाही, असं मानण्यात अर्थ नाही. (आणखी दोन वर्षांनी बारावीलाही तसंच वाटणार आहे.) त्यामुळे अपयशानं हुरळून किंवा पराभवानं खचून जाण्याचं कारण काय? इच्छा एकच की किमान
यंदा तरी परवाच्या पेपरमध्ये आत्महत्यांच्या बातम्या वाचायला लागू नयेत. (ही आशा भाबडी आहे, हे ही खरंच...!)
निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या-नसलेल्या सगळ्यांना मनापासून "ऑल दि बेस्ट!"
No comments:
Post a Comment