Thursday, 9 July 2009

कोण म्हणतं 'नावात काय आहे?'

शेक्सपियर म्हणालेला म्हणे... की "नावात काय आहे?" पण गोष्ट ऐकली आणि पुन्हा हा प्रश्न विचारायची त्याची हिम्मतच झाली नाही... कारण प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं "नावात राजकारण आहे....!" तुम्हीही ऐका ही गोष्ट, म्हणजे तुम्हाला पटेल की शेक्सपियरनं केवढी मोठी चूक केलेली ते....
***************************
एक नगर होतं किंवा असं म्हणा की महानगर होतं. राष्ट्राच्या अर्थव्यवहारांची राजधानी आणि त्या राज्याची खर्रीखुर्री राजधानी. अर्थात राज्य म्हंटलं की महाराज हवेतच... पण इथं महाराज हे लोकशाही पद्धतीनं निवडून आले होते. म्हणजे ज्या गटाला जास्त मतं मिळतील, त्या गटाचा सम्राट (सध्या सम्राज्ञी) महाराज कोण होणार ते ठरवतो, कधीही महाराज बदलतो, आधीच्या महाराजांना प्रधान करतो... अशी निखळ लोकशाही या राज्यात होती. तर सांगायची मुद्दा असा की, महाराजांनी समूद्रावर मोठ्ठाच्या मोठ्ठा सेतू बांधला एकदा. त्याच्या उद्घाटनाचा एक जंगी कार्यक्रम महाराजांनी घडवून आणला. महाराजांनी या कार्यक्रमात आपल्या आणि मित्रांच्या गटांमधल्या मोठमोठ्या नेत्यांना बोलावलं होतं. अशाच एका मित्रपक्षाच्या सगळ्यात मोठ्ठ्या प्रधानानं (ज्याची सम्राट व्हायची इच्छा होती...) खुद्द महाराजांच्या गटाच्या एका कैलासवासी सम्राटांचं नाव सेतूला द्यावं, असं सुचवलं... एक तर महाराजांच्याच गटाचा कै. सम्राट आणि त्यात त्या सम्राटांची बेगम आणि आत्ताची सम्राज्ञी स्वतः त्या कार्यक्रमात हजर... मग महाराजांची काय टाप आहे 'नाही' म्हणायची... झालं. या कार्यक्रमाला बोलावलं नाही, म्हणून विरोधी गटातले सगळेच गाल फुगवून बसले होते. त्यात हे 'नाव-रामायण' झाल्यामुळे त्यांना ऐतीच संधी मिळाली महाराजांवर आगपाखड करायला. या गटानं थोडी बोंबाबोंब केली. काही ठिकाणी निदर्शनं-बिदर्शनं केली. पण म्हणावी तितकी आरडाओरड झाली नाही आणि महाराज खट्टू झाले. त्यांना हवी होती तशी (कु)प्रसिद्धी मिळाली नाही आणि त्यांनी आपल्या सगळ्या प्रधानमंडळाला धारेवर धरलं.
त्यासाठी महाराजांनी प्रधान मंडळाची तातडीनं सभा बोलावली... विरोधी गटानं केलेली बोंबाबोंब पुरेशी नाही, हे महाराजांचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं. त्यांना आरडाओरड करायला नवा मुद्दा मिळवून दिला म्हणजे दिलाच पाहिजे, यावर एकमत झालं. पण करावं काय ते कोणाच्याच लक्षात येईना. राज्यातल्या गुरूकूलांमध्ये कोणाला घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न प्रलंबित होता. राज्यात पाऊस नव्हता आणि या महानगरात तर एकाच वेळी पूर आणि पाणीटंचाई होती. पण हे सगळं विरोधी गटांच्या पचनी पडत नाही, असं काही प्रधानांचं मत पडलं. तेवढ्यात नव्या सेतूला नाव सुचवणा-या सम्राटाच्या प्रधानाचा महाराजांच्या प्रधानमंडळात असलेल्या पुतण्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो प्रधान म्हणाला की, सेतूला जसं माजी सम्राटांचं नाव दिलंय काकांनी, तसं आपण आपल्या सांस्कृतिक शहर आणि राजधानीला जोडणा-या राजमार्गाला एका कै. महाराजांचं नाव देऊन टाकावं. त्याला काही प्रधानांनी हळूच विरोध केला म्हणे. नावाचा घोळ विरोधी गटांना पुरेसा होत नाही, याचं ताजं उदाहरण असल्यानं पुन्हा त्याच मार्गानं जाऊ नये, असं या प्रधानांना वाटत होतं. पण मग खूप विचार केल्यावर आणखी एक प्रयत्न करून बघावा, असं ठरलं आणि प्रधान मंडळाची सभा झाल्यावर महाराजांनी तशी दवंडीही पिटवली महानगरात...
झालं... कारण आधीच्या महाराजांनी (आत्ता विरोधात असलेल्या गटाच्या) एका मोठ्ठ्या-ज्ञानी-विचारवंत ऋषींचं नाव या राजमार्गाला देण्याचं ठरवलं होतं म्हणे. मग काय... पुन्हा गोंधळ सुरू. पुन्हा वादावादी... धमक्या... आंदोलनं... खुद्द महामार्गावर जाऊन (क्षणभरही थांबण्याची परवानगी नसताना) स्वतःच्या हातानं ऋषींच्या नावाचे फलक लावणं.... असे सगळे सोपस्कार पार पडले.
या सगळ्या प्रकाराकडे राज्यातली प्रजा मात्र डोळे विस्फारून आणि 'आ'-वासून बघत होती. म्हणजे पाऊस नाही, पिकं वाया चाललीत, प्यायला पाणी नाही, पोरांना गुरूकूलात जागा मिळेल की नाही माहित नाही, गुरूकूलात नीट ज्ञानप्राप्ती होईल की नाही माहित नाही अशा सगळ्या गराड्यात अडकलेली गरीब बिच्चारी प्रजा... कै. महाराज, कै. सम्राट, कै. ऋषी या सगळ्यांबद्दल प्रजेला नितांत प्रेम, आदर सगळं आहे. पण प्रजेला समजत नाहिये की एखाद्या सेतूला किंवा राजमार्गाला यांची नावं दिल्यानं त्यांचा आदर-प्रेम द्विगूणित कसं होईल. तसंही या सेतूवरून किंवा राजमार्गावरून केवळ मोठमोठ्या व्यापा-याचे रथच जातात-येतात. सामान्य प्रजा विचारी कुठे तिकडं फिरकणार. पण महाराज आणि 'महाराज व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले' या सगळ्यांनाच याचा विसर पडलाय. प्रजेच्या प्रश्नांशी कोणालाच काही घेणंदेणं उरलेलं नाही.
साता समूद्रापार फ्रान्स नावाच्या एका राज्यात म्हणे एक सम्राट होता... निरो नावाचा... त्याचं राजधानीचं नगर जळत असताना तो वाद्य वाजवत बसलेला म्हणे. आत्ताचे हे महाराज आणि 'महाराज व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले'-सम्राट-सम्राज्ञी-'सम्राट व्हायचं स्वप्न बाळगून बसलेले' असे सगळे त्या निरोचेच वंशज आहेत. प्रजा विचारी रोज दिवसभर होणारे तमाशे 'आ'-वासून बघते, उद्याचा विचार करत अंगाचं मुटकुळं करून झोपी जाते. साठा उत्तराची ही कहाणी कधीच संपूर्ण होणार नाही... आणि "सुफळ" तर नाहीच नाही....!
******************************
कुठेतरी ऐकल्यासारखी वाटत्ये का ही कहाणी? तसं असेल तर तो केवळ योगायोग समजू नये. तसं असूही शकतं. शेवटी कथा या वास्तवातून आलेल्या असतात ना....

1 comment:

ashishchandorkar said...

छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले किंवा अशी आणखी एक-दोन नावं वगळून भारतात कोणी मोठा नेता, अभियंता, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, क्रीडापटू, अभिनेता झाला की नाही असा प्रश्न विचारावासा वाटतो. की याच मंडळींची नावं आणखी पाचशे वर्ष द्यावी लागणार.

जमशेदजी टाटा, जे आर डी टाटा, नोबेल पुरस्कार विजेते सी व्ही रामन, कुष्ठरोग्यांसाठी हयात घालणारे बाबा आमटे, एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकर आणि के कस्तुरीरंगन यांच्यासारखे शास्त्रज्ञ, सचिन, कपिल, सुनील, अभिनव बिंद्रा, धनराज, प्रकाश पडुकोण, रामनाथन कृष्णन, लिएंडर पेस आणि गीत सेठी यांच्यासारखे क्रीडापटू, देशासाठी शहीद होणारे जवान, पोलिस किंवा इतर अधिकारी यांची नावं पुलांना, रस्त्यांना किंवा संस्थांना, सभागृहांना कधी मिळणार? की सर्व पक्ष आणि जातीय संघटना आपापल्याच नेत्यांच्या नावानं दुकानदाऱ्या सुरु ठेवणार हाच खरा प्रश्न आहे...