Sunday, 19 July 2009

एक (काल्पनिक) संवाद....!

(स्थळ : ओव्हल ऑफिस, व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
वेळ : आजपासून पाच-सहा दिवसांनी...
दृष्य : खाली दिलेल्या फोटोत दिसतंय... अगदी तस्सच...)

  • हिलरी : (घाम पुसत) दमले बाबा... पाच दिवसांनी घरी परत आल्यावर कसं बरं वाटतंय...
  • ओबामा : का? इतकं दमायला काय झालं? मी नाही का सगळीकडे जात वेगवेगळ्या समिट-बिमिटसाठी.
  • हिलरी : हं... तू तरूण आहेस लेका. माझं वय झालंय आता आणि आधीही मी बिलबरोबर अशीच फिरलीय जगभर. आता कंटाळा येतो परत परत तिथंच जायचा.
  • ओबामा : बरं... बरं... पण भारतभेट कशी झाली तुझी? मजा आली की नाही?
  • हिलरी : छ्छे... मजा कसली? नुसती माणसं... माणसं... माणसं... कंटाळा आला इतकी माणसं पाहून. जिकडे जावं तिकडे नुसती गर्दी... वैताग... तुला आता सांगते, मी पुढला महिनाभर तरी आजिबात गर्दीत जाणार नाही...
  • ओबामा : अरे... फारच वैतागलेली दिसतेस. ते जाऊ दे. तुझ्या भेटी-गाठी कशा झाल्या ते बोल...
  • हिलरी : हाँ... त्या ठिकठाक झाल्या. मुळात आपल्या देशातला कोणीही भुक्कड नेता भारतात गेला तर ते लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचायचंच बाकी ठेवतात. मी तर साक्षात परराष्ट्रमंत्री... आपण कुठे बाहेरचा कोणी नेता आला तर त्याचा इतका उदो-उदो करतो... त्यांची गुलामगिरीतली सवय जात नाहीये अजून. गोरा माणूस दिसला, की हे लागलेच नाचायला. आता तू गेलास तरी नाचतील म्हणा, काळा असलास तरी... (हसते)
  • ओबामा : अरेच्च्या... माझ्या रंगावर कशाला घसरतेस. मनमोहनसिंग भेटले की नाही? काय बोलले?
    हिलरी : भेटले रे... मी गेले आणि ते नाही भेटले, असं कसं होईल. पण ते तेव्हा काय बोलले समजलं नाही नीटसं. नंतर टीव्हीवर बघितल्यावर समजलं ते काय म्हणाले ते! फार हळू आवाजात बोलतात बाबा ते...
  • ओबामा : अरे व्वा...! पण मग बोललात कसे काय तुम्ही?
    हिलरी : म्हणजे काय? मी ठरवूनच गेले नव्हते का जाताना तुझ्यासोबत बसून. बिलनंही काही टिप्स दिल्या होत्या निघताना विमानतळावर... ते नेहमीचंच तुणतुणं वाजवलं... भारत-पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नात आम्हाला पडायचं नाही... काश्मीर प्रश्नावर लवकर तोडगा काढा... आम्ही दहशतवादाचा नायनाट करू... कोणत्याही परिस्थितीत जगातले सगळेच्या सगळे अतिरेकी संपवणार... अणूकरार कसा चांगला आहे... वगैरे... वगैरे... दुसरं काय बोलणार मी?
  • ओबामा : आणि मुंबईची ट्रीप कशी झाली? ताजमध्येच उतरलेलीस ना?
  • हिलरी : हो ना... पहिल्यांदा मला बाई टेंशनच आलेलं तिथं गेल्यावर. पण नंतर सावरले. तिथं सगळ्यात जास्त गर्दी होती बाबा बराक... जाम वैतागलेय गर्दीला...
  • ओबामा : पुन्हा गर्दी-पुराण नको सुरू करूस... एकूण काय, तुझा हा दौरा भलताच यशस्वी झाला म्हणायचा?
    हिलरी : हो... असं म्हणायला हरकत नाही... म्हणजे किमान मिडियासमोर बोलताना तरी तसंच म्हणायला हवं. पण खरं सांगू का मिस्टर प्रेसिडेंट... असला कुठलाच दौरा यशस्वी होत नसतो. आपल्याला काय हवं ते आपण करणार, त्यांना काय हवं ते ते करतात... थोडाफार व्यापार-बिपार वाढतो. आपल्या आणखी काही कंपन्यांना धंदा मिळतो... त्यांना थोडीफार विमानं-शस्त्रबिस्त्र द्यायला लागतात... इतकंच... बाकी १० वर्ष फर्स्ट लेडी म्हणून मिरवलं तरी दौरा यशस्वी झाला म्हणजे नेमकं काय झालं, हे मला अजूनही समजलेलं नाहिये बाबा... तुला पण समजेल ते हळूहळू... लहान आहेस अजून...
  • ओबामा : हं... असो... तुझ्या प्रेस कॉन्फरन्सची वेळ झालीय ना? चल पळ... हे अमेरिकेतले पत्रकार आहेत. तुझ्यासाठी तासन्तास थांबणार नाहीत... भारतातून आलीस तर तिथल्या नेत्यांसारखी वागू नको आपलं महत्त्व वाढवण्यासाठी मुद्दाम उशीर करून... निघ पटकन....
    हिलरी : हो रे बाबा... पळते. चल भेटू परत कॅबिनेटच्या वेळी नाहीतर काँग्रेसमध्ये.... अच्छा... (घाईघाईनं ओव्हल ऑफिसबाहेर पडते.)
(हा संवाद संपूर्ण काल्पनिक आहे. भारतीय किंवा भारतीय नेते यांची मनं दुःखवायचा लेखकाचा कोणताही हेतू नाही....)

4 comments:

Somesh Bartakke said...

सही !

मी आयटी मधे नोकरी करतो, आपण उचलेला मुद्द अगदी योग्य आहे. भारतातून अमेरिकेत कितीही मोठा अधिकारी आला तरी ते इथे नॉर्मल असते परंतू इथून तिकडे सामान्य ट्रेनी दर्जाचा गोरा गेला तरी त्याला फारच डोक्यावर घेतात हे मी अनुभवले आहे. :)

मी,
http://TheLife.in

सर्किट said...

sahee.. to the point!

some addition =>

gelyavar fakt bharatat media samor bharatala ata US ek world power manate. tumhi ata itake great ahat ki jara maturity dakhavali pahije. pakistan shi porakaTapaNe vaad ghalaNe bare naahi.

ase sangayache. sugar coated pill.

Anonymous said...

अमोलराव,
त्या निळ्या अक्षरांतल्या डिस्क्लेमरची गरज नव्हती!

ashishchandorkar said...

हिलरी आणि ओबामा यांच्या संवादाचा शेवट अगदी अप्रतिम झाला आहे. संवादाचा ओघ इतका अप्रतिम आहे की, खरोखरच असा संवाद झडला असेल की काय, असे वाटते...
मस्त रे..