Monday, 17 August 2009

Who is this "KHAN?"

"प्रधानजी..."
फोनवर महाराजांचा चिडलेला-पिचलेला आवाज प्रधानजींच्या चाणाक्ष कानांमधून सुटला नाही... पण त्यांनी तसं दाखवलं नाही... ते सहजच चौकशी करत असल्यासारखं म्हणाले, "काय म्हणतोय महाराज तुमचा परदेश दौरा? सगळं आलबेल आहे ना?"
या प्रश्नानं महाराज अधिकच भडकलेल्याचं प्रधानजींना जाणवलं. पण महाराजांच्या पुढल्या वाक्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं... महाराजांचा भडकलेला आवाज म्हणाला, "डोकं फिरल्यासारखं वागू नका... आमच्यावर इथं काय प्रसंग ओढवलाय माहित्ये का... मी आपल्या देशाचा 'किंग...' पण इथं परदेशात आम्हाला कोणी विचारत नाही... आमची तपासणी करतात... सामान चेक करतात, म्हणजे काय? आपल्या देशात आम्ही इतके प्रसिद्ध... लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात. पण इथं आम्हाला कोणीच विचारत नाही... म्हणजे काय?"
महाराजांच्या निर्बुद्धपणाचं प्रधानजींना हसायला आलं... पण ते फक्त चेह-यावर. आवाजात त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही... (म्हणुनच तर इतकी वर्षं ते प्रधानजी होते) आवाज गंभीर ठेवत प्रधानजी विचारते झाले, "नेमकं काय झालंय ते सांगाल का? तुमच्या आवाजावरून नक्कीच खूप चिडलेले दिसता तुम्ही..."
प्रधानजींचा काळजीचा स्वर ऐकून महाराजांना थोडं बरं वाटलं... मग ते डिटेल सांगते झाले, "आम्ही या देशातल्या नेवार्क विमानतळी उतरलो... आमचं आगत स्वागत करायला कोणी नव्हतंच, पण इथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला चक्क दोन तास डांबून ठेवलं... आमचं सगळं सामान तपासलं, कोणाला फोनही करू दिला नाही... आम्ही येणार असल्याची खबर तुम्ही दिली नव्हतीत का? तसं असेल तर परत आल्यावर तुम्हाला सुळावर चढवीन मी समजलं ना..."
प्रधानजींना असल्या गोष्टींची सवय होती. महाराज येत असल्याचं लेखी कळवल्याची ऍक्नोलेजमेंट त्यांच्या खिशात होती. त्यामुळे ते निर्धास्त होते. पण महाराजांची 'खेचण्याची' ऐती चालत आलेली संधी ते कशाला सोडतायत... प्रधानजी म्हणाले, "हो महाराज... कळवलं होतं मी तिथल्या महाराजांना आपण जात असल्याचं. त्यावर त्यांचं उत्तरही आलंय... त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या विनंतीवरून तुम्ही तिथं आलात, तर प्रोटोकॉल-बिटोकॉल ठिक आहे. पण तुम्ही एका खासगी कार्यक्रमासाठी तिथं गेलात. त्यामुळे सामान्य पर्यटकाला ज्या सुरक्षाकवचातून जावं लागतं, तेच तुम्हालाही लागू आहे... म्हणजे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांची चुकच झाली..." प्रधानजींनी बॅकफूटवर येत एक फटका लगावला... महाराज विचारात पडल्याचं त्यांना जाणवलंच... "त्यांचा अजून एक मुद्दा आहे. त्यांच्या मते तुम्ही काही आपल्या देशातले खर्रे-खुर्रे किंग नाही... तुम्ही केवळ चलचित्रांच्या क्षेत्रात किंग आहात. मग तुमच्यासाठी प्रोटोकॉल का पाळायचा... त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणे ते... ते ख-या किंगला पण सोडत नाहीत... तुम्ही तर 'कठपुतली किंग' आहात, असं लिहिलंय त्यांनी दिलेल्या उत्तरात..."
थोडा वेळ गेल्यावर महाराज म्हणाले, "हं...... ते पण खरंच आहे म्हणा... आता असं करा... तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या... त्यात डिक्लेअर करा, की आमच्या महाराजांचं आडनाव 'खान' असल्यामुळेच त्यांना अडवलं... म्हणजे दोन गोष्टी होतील. एक तर आपल्या आडनावाचे लोक खुष होतील आणि आपल्या पुढल्या चलचित्राची पब्लिसिटी होईल... कशी वाटली आयडिया..."
"झक्कास आयडिया महाराज... काय डोकं लढवलंयत... झक्कासच! म्हणजे आम के आम... गुठलियोंके दाम! एकदम भारी... कसं काय सुचतं तुम्हाला हे.. व्वा.. व्वा..."
"पुरे आता... आम्हाला उगीच हरभ-याच्या झाडावर चढवू नका... फोन ठेवा आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवा... मी परत येण्यापूर्वी या गोष्टीची पुरेशी चर्चा झाली असली पाहिजे...."
*********************
प्रधानजींनी फोन ठेवला... अशी कुठलीच पत्रकार परिषद बोलवायची गरज नाही, हे प्रधानजींना माहित होतं. त्यांचे सगळ्याच मोठ्या पेपर्स आणि चॅनल्समध्ये 'सोर्सेस' होते. त्यांनी दोन-तीन जणांना फोन केले... जास्त जवळच्या तीन-चार जणांना फक्त 'मिसकॉल' दिले....
*********************
हे फोन झाल्यावर प्रधानजींनी इंटरनॅशनल कॉल लावला... अमेरिकेतल्या नेवार्क विमानतळावरच्या सुरक्षा प्रमुखाचा मोबाईल... आणि इतकंच म्हणाले, "असिस्टंट ऑफ किंग खान हियर... थँक्यू व्हेरी मच... डोण्ट टेल महाराज दॅट वॉज माय प्लॅन...!"
फोन ठेऊन प्रधानजी शांतपणे 'मधुशाले'कडे चालते झाले...

1 comment:

Anonymous said...

uttam lekh